श्री नागेश्वर महाराज व इतर देव देवस्थान ट्रस्ट
गावातील मुख्य चौकात पूर्वाभिमुखी विशाल असे श्री नागेश्वर महाराजांचे मंदिर आहे. हे गावचे मुख्य दैवत. गावाला एकत्र गुंफून ठेवणारा गावाला सुखी, समृद्ध ठेवणारा हा शक्तिस्रोत. असे सांगितले जाते की, नाशिकला कुंभमेळ्यासाठी देशभरातील, विविध संप्रदायातील साधू जातात. त्यापैकीच एका आखाड्यातील काही साधू कुंभमेळ्याहून परतत असताना त्यामधील एका साधूमहाराजांना अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा ते सर्वजण मोशी गावात काही काळ थांबले. नंतर प्रमुख गावकरी मंडळींना सांगून त्या साधूमहाराजांना विश्रांतीसाठी गावातच ठेवून बाकीचे पुढील प्रवासाला निघून गेले. हेच ते नागेश्वर महाराज. गावकरी मंडळींनी गावाजवळच त्यांच्यासाठी गवत, बांबूच्या साहाय्याने साधा मठ किंवा वसतिस्थान तयार करून दिले. अर्थात, साधूमहाराजांचे राहणे ही निश्चितच सामान्य बाब नव्हती. त्यांचे आचरण, नियम, तप, ध्यान वगैरे बाबी होत्या. ते नित्य पाच घरी माधुकरी मागत. पीठ, तांदूळ वगैरे न शिजविलेले पदार्थ घेऊन गावाजवळील एका आमराईत स्वहस्ते शिजवून ते खात असत. तिथेच जप-तप करीत असत. सामान्य माणसाचे जीवन म्हणजे सुख दुःखाची वीण असते. अशा वेळी गावकरी मठामध्ये त्यांच्या दर्शनाला जात असत. ते आशीर्वाद आणि सल्ला देत. त्यांच्या आशीर्वादाने जगण्याला एक शक्ती मिळे. असे काही दिवस गेल्यानंतर एकदा माधुकरी मागताना कोणी एका महिलेने जाणीवपूर्वक किंवा नकळत शिजविलेले अन्न वाढून त्यांचा अवमान केला. महाराजांना ते सहन झाले नाही. त्यांनी त्याचक्षणी गावातून जाण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी खूप विनवणी केली, माफी मागितली. त्यांनी सर्वांना क्षमा केली, 'सर्वकल्याणभवतुः' आशीर्वाद दिला; पण आपला कार्यकाळ संपुष्टात आल्याने निघायला हवे,' असे सांगून पूर्व दिशेने ते चालू लागले. 'सूर्य अस्ताला जाईपर्यंतच आपला प्रवास असेल, असे त्यांनी सांगितले. मोशीपासून पूर्व दिशेला सुमारे दहा बारा किलोमीटर अंतरावर इंद्रायणीच्या तीरावर वसलेल्या काकडे वडगावमध्ये हे योगीमहाराज पोहचले आणि सूर्य अस्ताला गेला. त्याच ठिकाणी महाराजांनी संजीवन समाधी घेतली. आपले जीवनकार्य संपविले. त्या ठिकाणी पुढील काळात मोठे मंदिर बांधण्यात आले.
मोशीकरांनी महाराज राहत असलेल्या मठाचे मोठ्या श्रद्धेने मंदिरात रूपांतर केले. ते अन्न शिजवून खात असलेल्या आमराईत कायमस्वरूपी नंदादीप प्रज्वलित केला. त्याला 'तपोभूमी' म्हणतात. एवढेच नव्हे, महाराजांच्या समाधीचा दिवस माघ अमावास्येला सर्व गावकरी या ठिकाणी अन्न शिजवून प्रसाद सेवन करतात. त्याला 'भंडारा' म्हणतात. हा भंडारा मोशीकरांच्या जीवनातील एक महत्त्वाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. गावातून उद्योग नोकरीसाठी इतस्ततः गेलेले सर्व जण आवर्जून या दिवशी या सोहळ्यास येतात. एरवी वर्षभर न येणाऱ्या सासूरवाशिणी, माहेरवाशिणी लेकी-सुना हा भंडारा उघड्या नयनांनी, श्रद्धाभावनेने अनुभवतात. हा सोहळा गावच्या एकोप्याचा, एकविचाराचा सोहळा असतो. इथे कोणी लहान नाही, मोठा नाही. गटातटाचा, तुझा माझा आविर्भाव नाही की कोणाच्या श्रीमंतीचा आविष्कार नाही. आमराईच्या शेतात हजारोंच्या पंगती उठताना, सर्व सोहळा गावकऱ्यांच्या स्वयंशिस्तीत पार पडतो. वैशिष्ट्य म्हणजे याला कोणी आयोजक अथवा प्रायोजक नाहीत. मोशीचे गावकरी हेच आयोजक आणि तेच प्रायोजक. सर्व जातीजमातींचे लोक यामध्ये सहपरिवार सहभागी होतात. प्रत्येक जण स्वतःहून आपली वर्गणी भरतात. हा सोहळा पिढ्यानपिढ्या चाललेला आहे. कदाचित हा महाराष्ट्रातील एकमेव आगळावेगळा, एकोप्याचा, गावकऱ्यांच्या एकविचाराचा सोहळा असेल. त्यामध्ये कधीही खंड नाही. कोणी कोणास बोलावत नाहीत, निमंत्रण देत नाहीत. पंढरीच्या वारीसाठी जशी स्वयंप्रेरणेने लाखोंची पावले पडतात, तशीच या नागेश्वर महाराजांचा भंडारा अनुभवण्यासाठी आमच्या मोशीवासीयांची पावले आमराईकडे वळतात. विशेष म्हणजे आज चौफेर वाढलेल्या शहरीकरणातही ही परंपरा अव्याहत चालू आहे. म्हणूनच माझे गाव इतर हजारो गावांपेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गावाला इंद्रायणीचा गोडवा आणि आपुलकीचा ओलावा आहे. ज्ञानदेव तुकोबांच्या सान्निध्याचा वारसा आहे. श्री नागेश्वर महाराजांच्या वास्तव्याचा कृपाप्रसाद आहे. म्हणूनच मोशीचा गावकरी ऐश्वर्यसंपन्न आहे, सुखात आणि समाधानात आहे. अशा अनेक उल्लेखनीय परंपरा व प्रथा या गावामध्ये आहेत.
परमभक्तीचा नंदादीप : श्री नागेश्वर महाराजांविषयी या पंचक्रोशीत परमआदर व भक्तिभाव पाहावयास मिळतो. गावातीलच श्री. नामदेव काशिबा आल्हाट यांची श्री नागेश्वराचे परमभक्त म्हणून ख्याती आहे. शेतकरी कुटुंबातील नामदेवराव हे जुन्या काळातील सातवी (फायनल) पर्यंत शिकलेले होते. त्यांना व्यायामाची, अर्थात कुस्तीक्षेत्राची आवड होती. शिकलेले असल्याने त्या काळात त्यांना मुंबईला शासकीय नोकरी मिळाली होती; परंतु त्यांचा भक्तिभाव श्री नागेश्वरचरणी लीन होता. ते मुंबई सोडून पुन्हा मोशीमध्ये आले. नागेश्वरांची तपोभूमी असलेल्या आमराईत नंदादीप प्रज्वलित केला. तिथेच सेवा करू लागले. त्यांनी नोकरी केली, पण घर कुटुंब, शेतीवाडी या पाशातून ते अलिप्त झाले. एक प्रकारे त्यांनी गृहस्थाश्रमातून विरक्ती घेतली होती. त्यांनी एक व्रत म्हणून या तपोभूमीची सेवा केली. ती करताना ते आयुष्यभर अनवाणी राहिले, तसेच कधीही केस-दाढी केली नाही. 'निळावंती' या दुर्मीळ ग्रंथाचे त्यांनी वाचन केले होते. श्री नागेश्वरांच्या नंदादीपाची देखभाल, आमराईतील निगा आणि ईश्वराचे नामस्मरण यांमध्ये ते अहोरात्र तल्लीन होते. विशेष म्हणजे अहंकाराचा लवलेश नव्हता, कुठेही मीपणा नव्हता. ते निर्विकार त्यागमूर्ती होते. श्री नागेश्वर महाराजांचे परमभक्त म्हणून लोक आदराने त्यांच्याकडे पाहायचे. सन १९९२मध्ये त्यांनी देह सोडला, त्या वेळी त्यांचे वय अंदाजे ८४-८५ वर्षांचे होते. त्यांच्यानंतरही नंदादीप सेवा अखंडपणे चालू आहे. कौतुकाची बाब म्हणजे या तपोभूमीचे नुकतेच २०१८-१९मध्ये शिवकाळानुसार सुशोभीकरण करण्यात आले असून, ते आवर्जून पाहण्यासारखे आहे.